ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये त्यांच्या हक्कांबद्दल आणि कायद्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील करडीगुद्दी गावात विनामूल्य कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगावचे केएलएस राजा लखमगौडा विधी महाविद्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि करडीगुद्दी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले. ज्येष्ठ दिवाणी न्यायाधीश के. एन. शिवकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात मारीहाळ पोलीस ठाण्याचे पीएसआय नवीन के. उपस्थित होते.

शिबिरात प्रमुख वक्त्या व वकील प्रतिमा जोशी यांनी महिलांचे हक्क, हुंडा प्रतिबंधक कायदा, समान वेतन, कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा आणि विनामूल्य कायदेविषयक मदत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तर प्राचार्य डॉ. डी. प्रसन्न कुमार यांनी अध्यक्षीय भाषणातून कायदेविषयक साहाय्याचे महत्त्व स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत विकास अधिकारी रविकांत सी. एम., माजी तालुका पंचायत अध्यक्ष शंकर गौडा पाटील, माजी उपाध्यक्ष हालप्पा नेसर्गी आणि प्राध्यापक प्रीतम रेवणकर यांनी उपस्थित राहून सहकार्य केले. विधी शाखेची विद्यार्थिनी संजना इटगी हिने सूत्रसंचालन केले, तर सचिन कोटगी याने उपस्थितांचे आभार मानले. शशीधर ससालट्टी आणि प्रवीण कांबळे यांच्या सहकार्याने शिबिराची सांगता झाली.


Recent Comments