विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यात असलेल्या बाडीहाळ गावातील तलावातील पाणी पातळी कमालीची खालावल्याने लाखो माशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आलमट्टी धरणातून पुरेसा पाणीपुरवठा न झाल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

बाडीहाळ तलावातील पाणी बहुतांश आटल्यामुळे माशांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजनची तीव्र कमतरता निर्माण झाली आणि मोठ्या प्रमाणावर मासे मृत पावले. गेल्या काही दिवसांपासून या तलावातील पाणी पातळी सातत्याने कमी होत होती, त्यामुळे हजारो मृत मासे पाण्याच्या किनाऱ्यावर तरंगताना दिसत आहेत. या तलावातील मासेमारीवर अवलंबून असलेल्या स्थानिक मच्छिमारांचे यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या उपजीविकेचा साधन हिरावले गेले आहे.

लाखो रुपयांची मत्स्यसंपत्ती नष्ट झाल्याने मच्छिमार हवालदिल झाले आहेत. दरम्यान, तलावातील मृत माशांमुळे परिसरात सर्वत्र प्रचंड दुर्गंधी पसरली असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


Recent Comments