बेळगाव सीमाप्रश्नी महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद न्यायप्रविष्ट आहे. एकीकडे कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, कन्नड सक्तीचा बडगा, जमीन, पाणी, आणि भाषेवरून सुरु असलेला वाद आणि दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने तुळजापूर देवस्थानासंदर्भात दाखविलेला उदारमतवादीपणा… आदिशक्ती तुळजाभवानी मंदिर परिसरात मराठीसोबतच कन्नड आणि तेलगू भाषेत भाविकांना माहिती देणारे फलक बसवून महाराष्ट्र सरकारने कर्नाटकातील भाविकांची मने जिंकली आहेत.

आदिशक्ती तुळजाभवानी मंदिरात महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविक दर्शनासाठी येतात. कर्नाटकातील भाविकांसाठीदेखील तुळजाभवानीचे महत्व खूप आहे. या देवस्थानात वर्षभर भाविकांची गर्दी असते. नवरात्रोत्सवात हि गर्दी मोठ्या प्रमाणात असते. याची दखल घेत महाराष्ट्र सरकारने देवस्थान परिसरात कन्नड आणि तेलगू भाषिकांसाठी सूचना फलक लावण्यात आले आहेत. चोर-खिसेकापूंपासून सावध रहा, प्रथमोपचार केंद्र, पार्किंगकडे जाणारा मार्ग, बस वेळापत्रक आदी फलक महाराष्ट्र सरकारने मराठीसह कन्नड, तेलगू भाषेतही लावले आहेत. केवळ नवरात्रच नाही तर वर्षभर कर्नाटकातील भाविक मोठया संख्येने आदिशक्ती तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी तुळजापूरमध्ये दाखल होतात. या भाविकांसाठी महाराष्ट्र सरकारने घेतलेली दखल हि खरोखरच कौतुकास्पद असून महाराष्ट्र सरकारने कन्नड भाषिक भाविकांसाठी दिलेल्या आदराच्या वागणुकीमुळे आनंद व्यक्त होत आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजाभवानी मंदिर परिसरातच केवळ कन्नड भाषेचा वापर केला जात नाही, तर देवस्थानातील अनेक पुजारी देखील कन्नड भाषेचा वापर करून पूजाविधी करतात. अनेक भाषिक भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात. या प्रत्येकाचा आदर या देवस्थानात केला जातो हे विशेष. महाराष्ट्राच्या मराठी मातीतील स्नेहपूर्वक आदरातिथ्य पाहून येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांकडून देवस्थान समिती आणि महाराष्ट्र सरकारचे भरभरून कौतुक केले जाते.
महाराष्ट्राला सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा आहे. इथली माती, इथली माणसं हि महाराष्ट्र या नावाप्रमाणेच मोठ्या मनाची आहेत. ‘अतिथी देवो भवः’ याप्रमाणे इथल्या मातीच्या कणाकणात दुसऱ्याला मान, सन्मान देणे, आदरातिथ्य करणे हि संस्कृती आणि परंपरा रुजलेली आहे. कर्नाटक सरकारच्या अन्यायाखाली खितपत पडलेल्या मराठी भाषिकांची महाराष्ट्राला जाण आहे. परंतु आपल्या मातीत येणाऱ्या प्रत्येकाला आदर देणे, प्रत्येकाची काळजी घेणे हे महाराष्ट्राच्या रक्तात आहे. महाराष्ट्र सरकारने घेतलेली अशी दखल हि येथे येणाऱ्या प्रत्येकाकडून कौतुकास पात्र अशीच असून कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी भाषिकांची अशी काळजी कधी घेणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.


Recent Comments