कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे सूप वाजल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमुळे काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या असून, पक्षात एकंदर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. प्रदेश प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला यांनी आज ज्येष्ठ नेते सिद्दरामय्या यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक घेऊन चर्चा केली.
कर्नाटकात काँग्रेसला बहुमत किंवा सत्ता मिळणार असे निष्कर्ष निवडणुकीच्या आधी झालेल्या सर्व्हे, ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आले होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यानंतर काल मतदान झाल्यानंतर काही संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलमध्येही काँग्रेसला बहुमत-सत्ता मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळे पक्षाच्या आशा आणखी पल्लवित झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये घडामोडीना वेग आला आहे.
काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला यांनी आज विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत कोणत्या परिस्थितीत काय पावले उचलून सत्तेचा सोपान चढायचा यावर खल करण्यात आला. काही डावपेचही आखण्यात आले. मात्र त्याची नेमकी माहिती मिळू शकली नाही.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, 13 तारखेपर्यंत प्रतीक्षा करा, असे सूचक उत्तर सुरजेवाला यांनी दिले. कर्नाटकातील बंधू-भगिनींनी चांगले मतदान केल्याचा विश्वास आहे. 40% कमिशनचे भ्रष्ट सरकार उलथून बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी मतदान केलेय. 13 तारखेपर्यंत प्रतीक्षा करा, नवकर्नाटक निर्माण करणारे काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे असे त्यांनी सांगितले.
एकंदर, निवडणुकीच्या आधीचे पोल आणि मतदानानंतरच्या एक्झिट पोलच्या निष्कर्षांमुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आतापासूनच वेळ न दवडता सत्तेचा सोपान चढण्यासाठी काँग्रेसने खलबते सुरु केली आहेत.


Recent Comments