बेंगळुरू येथील थणिसंद्र परिसरातील एका गॅरेजमध्ये भीषण आग लागून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

थणिसंद्र मुख्य रस्त्यावरील भारती सिटीजवळ असलेल्या गॅरेजमध्ये ही आग लागली. आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केल्यामुळे गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या जॅग्वार आणि रेंज रोव्हरसह २५ महागड्या कार पूर्णपणे जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या ५ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

आगीची तीव्रता जास्त असल्याने लगतच्या युपीव्हीसी खिडक्या तयार करणाऱ्या कारखान्याला आणि शेजारील शेडमध्ये उभ्या असलेल्या ८ ऑटो रिक्षांनाही आगीने लपेटले, ज्यामध्ये लाखोंचे साहित्य जळाले आहे.

गॅरेज कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आणि अग्निशामक दलाच्या कारवाईमुळे ही आग आजूबाजूच्या इतर इमारतींमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आले.
प्राथमिक तपासानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात असून, संपिगेहळ्ळी पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.


Recent Comments