साखर कारखानदारांच्या धोरणांवर आणि ऊसदर निश्चितीच्या प्रक्रियेवर शेतकरी नेते किसान नंदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. साखरेचे दर वाढलेले असतानाही कारखानदार शेतकऱ्यांना योग्य भाव देत नसून, रिकव्हरीचे प्रमाण कमी दाखवून फसवणूक करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
यापूर्वी प्रतिटन ५,५०० रुपये दराची मागणी केली असता कारखाने बंद करण्याची धमकी देणाऱ्या कारखानदारांनी जिल्हाधिकारी आणि मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रतिटन ३,६०० रुपये दर निश्चित झाल्यानंतर आता स्वतःच्या मर्जीने ३,८०० ते ४,००० रुपये देण्याची भूमिका घेतली आहे. हा प्रकार शेतकरी नेत्यांना संपवण्याचा डाव असल्याचा आरोप किसान नंदी यांनी केला.

बाजारात साखरेचा दर ५५ रुपयांच्या पुढे गेला असतानाही कारखानदारांकडून अधिकृत पत्रात प्रतिटन ४,२०० ते ४,३५० रुपये दर नमूद केला जात नाही. बेळगाव जिल्हा देशात ऊस उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असून, राज्यात ११.७३ टक्के अधिकृत रिकव्हरी असतानाही कारखानदार स्वतःच्या प्रयोगशाळांद्वारे रिकव्हरीचे प्रमाण जाणीवपूर्वक कमी दाखवत आहेत. यातून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप किसान नंदी यांनी केला.


Recent Comments