अतिशय धीम्या गतीने सुरु असलेल्या विकासकामांचा चांगलाच फटका आज कणबर्गी परिसराला बसला. काही वेळच पडलेल्या पावसाने येथील नागरिकांची दाणादाण उडवली. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
बेळगावसह कणबर्गी परिसरात आज दुपारी अवकाळी पाऊस झाला.

पण या परिसरात अत्यंत धीम्या गतीने सुरु असलेल्या रस्ते, गटारी आदी विकासकामांमुळे पाणी निचरा होण्यास वाव नसल्याने रस्त्यावर पाणी साचून जणू तळेच निर्माण झाले. गटारी पूर्ण झाल्या नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यांवर साचून पादचारी आणि वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली. खासकरून गावच्या प्रवेशद्वारावरच सांडपाणी आणि चिखल, दलदलीचा सामना नागरिकांना करावा लागला. अनेक वाहनचालक रस्त्यातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने पडून जखमी झाले. नागरिकांना विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना स्थानिक रहिवाशांनी बेळगाव मनपा आणि स्मार्टसिटी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा तीव्र निषेध केला. तातडीने यात लक्ष घालून परिस्थिती सुधारावी अन्यथा, कणबर्गी-गोकाक रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनाही प्रचार करू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
एकंदर, वळीवाच्या पावसाने कणबर्गी परिसराला चांगलाच फटका बसला. ज्या अधिकाऱ्यांमुळे रहिवाशांना हा त्रास सहन करावा लागला ते किमान आतातरी डोळे उघडून याकडे बघणार का हाच खरा प्रश्न आहे.


Recent Comments