विजापूर जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे. विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील नालवतवाड येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे रुग्णालये जलमय झाली आहेत.
नालवतवाड येथील डॉ. एस बी गंगनगौडर आणि डॉ दिव्या पाटील यासह अश्विनी क्लिनिक मध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. यादरम्यान उपचारासाठी आलेल्या रुग्णांची तारांबळ उडाली आहे. गुडघाभर पाण्यातूनदेखील रांगा लावून डॉक्टरांची भेट घेण्यासाठी रुग्ण थांबल्याचे चित्र पाहायला मिळाले. इतकेच नाही तर नालवतवाड परिसरातील अनेक भागात पावसाचे पाणी शिरले आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी, पावसाची संततधार असल्याने या भागातील नागरिकांनी बराच वेळ विविध ठिकाणी आसरा घेत पाऊस थांबण्याची वाट पहिली.
विजापूरमधील अनेक भागात ७ ते ८ सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडला आहे. तर काही ठिकाणी ४ ते ५ सेंमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात गुरुवारी सूर्यदर्शन झालेच नसून पावसाने मात्र नागरिकांना हैराण केले आहे.
जिल्ह्यात काहीठिकाणी जोरदार पाऊस, काहीठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी अत्यंत कमी पाऊस पडला आहे. दुष्काळी भागात अशा पद्धतीने पडलेल्या पावसामुळे नागरी सुविधांची वानवा झाली आहे. तालिकोट येथे २४ तासात ४६ मिलीमीटर पावसाची तर विजापुरात ३८.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांसाठी मात्र पावसाने दिलासा दिला आहे.


Recent Comments