हुक्केरी तालुक्यातील होसूरमध्ये घरात एकट्या असलेल्या महिलेचा खून करून दागिने लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
गावातील निवृत्त पीएसआय भीमराय अक्कतंगेरहाळ यांची दुसरी पत्नी मालुताई या घरात एकटी असल्याचे पाहून दरोडेखोरांनी त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून हत्या केली. त्यानंतर त्यांच्या अंगावरील दागिने लुटले.
या घटनेने होसूर गावात एकच खळबळ माजली आहे. भीमराय आजारी असल्याने आपल्या पहिल्या पत्नी, मुलांच्या घरी मच्छे येथे राहण्यास गेले आहेत. त्यामुळे मालुताई एकट्याच घरी रहात होत्या. याची संधी साधून दरोडेखोरांनी डाव साधला. तोंडात बोळा कोंबून त्यांची हत्या करून त्यांच्या अंगावरील दागिने आणि घरातील दागिने व पैसे लुटून त्यांनी पोबारा केला. सीपीआय रमेश छायागोळ यांनी एफएसएल तज्ञांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
ठसेतज्ज्ञांनी काही ठसे घेतले आहेत. या घटनेने होसूर परिसरात एकच खळबळ माजली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात अनेक लहान-मोठ्या चोऱ्या होत आहेत. याबाबत पोलिसांना कळवून देखील दाद दिली जात नाही. त्यामुळे गावात पोलिसांविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Recent Comments