Crime

धारवाडमधील कर्नाटक विद्यापीठात प्राध्यापकावर गंभीर आरोप

Share

धारवाडमधील कर्नाटक विद्यापीठात वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक देवराज तंगुदोरै यांच्यावर एका विद्यार्थिनीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा आणि दुसऱ्या पीएचडी विद्यार्थ्याला छळल्याचा गंभीर आरोप झाला आहे.

याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे तक्रार दाखल केली असून प्राध्यापकाच्या निलंबनाची मागणी केली जात आहे. प्राध्यापक देवराज तंगुदोरै यांनी त्यांच्याकडे पीएचडी करण्यासाठी आलेल्या विजापूरमधील एका विद्यार्थिनीसोबत जवळीक साधली होती. ही बाब समजताच कुटुंबीयांनी त्या विद्यार्थिनीचे शिक्षण अर्ध्यातच थांबवून तिला घरी नेले. त्यानंतर प्राध्यापकाने विजापूरमधीलच वेदव्यास चव्हाण या दुसऱ्या पीएचडी विद्यार्थ्यावर, त्या विद्यार्थिनीला परत बोलावण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. विद्यार्थिनीला परत आणल्यास, तरच पीएचडी पूर्ण करून देण्याची धमकी प्राध्यापकाने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या त्रासाला कंटाळून वेदव्यास चव्हाण यांनी कुलसचिव आणि विद्यार्थी संघटनेकडे धाव घेतली असून संबंधित संभाषणाच्या ऑडिओ क्लिपही समोर आल्या आहेत.
अशी माहिती वेदव्यास चव्हाण यांनी दिली.

प्राध्यापक देवराज तंगुदोरै यांनी संबंधित विद्यार्थिनीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावरही पोस्ट केले होते. या सर्व प्रकारामुळे संबंधित प्राध्यापकावर कडक शिस्तभंगविषयक कारवाई करावी आणि पोलिसांत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विद्यार्थी संघटनेने केली आहे.
अशी माहिती नागराज यांनी दिली.

या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया विचारली असता, हा शैक्षणिक विषय असून यावर मी काहीही बोलणार नाही, असे प्राध्यापक देवराज तंगुदोरै यांनी म्हटले आहे. विद्यार्थी संघटनेने हा विषय गंभीरपणे घेतला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. कुलगुरू आणि कुलसचिवांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली असून आता प्रशासन काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: