ARREST

बेळगावमध्ये आणखी एक मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस

Share

बेळगावमध्ये नागरिकांना जादा व्याजाचे अमिष दाखवून तब्बल २११ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून ‘आदित्याराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचे कार्यालय सील करण्यात आले आहे. याप्रकरणी कंपनीच्या सीईओसह १० जणांवर टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेळगावमधील शिवानंद नीलण्णावर फसवणूक प्रकरणापाठोपाठ आता कोट्यवधी रुपयांचा हा दुसरा मोठा गुंतवणूक घोटाळा उघडकीस आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली असून सहकार विभागाचे सहायक निबंधक जबीउल्ला यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. दाखल झालेल्या एफआयआरनुसार, ए१ आरोपी म्हणून आदित्याराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, ए२ आदित्याराज कमोडिटीज, ए३ आदित्याराज सिक्युरिटी कंपनी आणि ए४ आरोपी म्हणून संस्थेचा मालक व संस्थापक सीईओ बालराज माने यांच्यासह इतर ६ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या आदित्यराज संस्थेने नागरिकांना १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तब्बल ५ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवले होते. यावर विश्वास ठेवून ३ हजारांहून अधिक गुंतवणूकदारांनी ६,५०० पेक्षा जास्त वेळा येथे गुंतवणूक केली. या माध्यमातून गोळा झालेली २११ कोटी रुपयांची मोठी रक्कम रिझर्व्ह बँक (RBI) आणि सेबीच्या (SEBI) नियमांचे उल्लंघन करून चार वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली. ही रक्कम स्वतःच्या आणि कंपनीच्या नावावरील खात्यांवर वर्ग करण्यात आली होती. फसवणूक उघडकीस येताच आरोपींनी डिजिटल माहिती डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सध्या आरोपींविरुद्ध बर्ड्स (BUDS) आणि केपीआयडी (KPID) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Tags: