बेळगावमधील आदित्यराज कॅपिटल संस्थेचे बेकायदेशीर जाळे जिल्हा प्रशासनाने उघडकीस आणले आहे. सेबी आणि आरबीआयची कोणतीही नोंदणी नसलेल्या या संस्थेविरुद्ध केपीआयडी आणि बड्स कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण आता सीआयडीकडे सोपवण्यात आले आहे.

बेळगावमध्ये जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या कारवाईची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गेल्या दोन दिवसांपासून आदित्यराज कॅपिटल संस्थेवर केपीआयडी आणि बड्स कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत असून काल रात्री याप्रनी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी शिवम असोसिएट्सवर कारवाई करताना अशा अनेक पोंझी स्कीम्स चालवल्या जात असल्याची माहिती मिळाली होती. आदित्यराज कॅपिटलमध्ये नियमबाह्य पद्धतीने निधी गोळा केला जात होता आणि गुंतवणूकदारांना दरमहा ५ टक्के व्याजाचे आमिष दाखवले जात होते. ही संस्था सेबीकडे पोर्टफोलिओ फंड मॅनेजर म्हणून नोंदणीकृत नाही, ज्यामुळे ही पोंझी स्कीम असल्याचे स्पष्ट होते. या संस्थेत सुमारे ६ ते ७ हजार गुंतवणूकदारांचे ५० कोटींहून अधिक रुपये जमा असल्याने हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्याची शिफारस अप्पर मुख्य सचिवांना करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.

गुंतवणूकदारांनी घाबरून जाण्याची गरज नाही, त्यांचे पैसे सुरक्षित ठेवून ते परत मिळवून देणे ही आमची जबाबदारी आहे. पुढील ६ महिन्यांत पुरावे सादर केल्यास गुंतवणूकदारांचे पैसे परत केले जातील, तसेच बेकायदेशीरपणे ठेवी गोळा करणारेच यात दोषी ठरतील. दरम्यान, आदित्यराज कॅपिटलचा सीईओ बळराज माने हा देशातच असून तो परदेशात पळून जाऊ नये म्हणून देशातील सर्व विमानतळांना सूचित करून त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले.
सहायक उपनिबंधकांच्या तक्रारीवरून टिळकवाडी पोलीस ठाण्यात आदित्यराज कॅपिटल्सविरुद्ध बड्स ॲक्ट, केपीआयडी ॲक्ट आणि भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेच्या कार्यालयातील कॉम्प्युटरमधील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असून मुख्य आरोपी सध्या फरार आहे. या संस्थेची आरबीआयकडून कोणतीही अधिकृत नोंदणी झालेली नाही आणि आरोपीकडून तपासात योग्य सहकार्य मिळत नसून जनतेची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.


Recent Comments