आपण बैलगाडी शर्यतीचे नाव ऐकले आहे. बैलगाडी शर्यत हि सर्वसामान्य आहे. परंतु विजापूरमध्ये घोडा आणि बैल या दोन्ही जनावरांना गाडीला बांधून अनोखी स्पर्धा घेतली जाते. शेतकऱ्यांना आपल्या दैनंदिन जीवनातून थोडे मनोरंजन मिळावे या उद्देशाने आयोजित केलेली हि शर्यत पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

विजापूर जिल्ह्यातील रंभापूर गावात रामलिंगेश्वर यात्रा भरविण्यात येते. या यात्रेच्या निमित्ताने एक अनोखी अशी स्पर्धा भरविण्यात येते. सर्वसामान्यपणे बैलगाडी शर्यत आपण सर्वत्रच पाहतो मात्र या ठिकाणी गाडीच्या एका बाजूला बैल आणि दुसऱ्या बाजूला घोडा बांधून भन्नाट शर्यतीचे आयोजन करण्यात येते. हि स्पर्धा पाहण्यासाठी रंभापूरसह आसपासच्या गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात. साधारण तीन किलोमीटर पर्यंतच्या मार्गावरून या गाड्या धावतात. शेतकऱ्यांच्या दैनंदिन आयुष्यातील कामापासून विरंगुळा मिळावा, मनोरंजन व्हावे, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
या स्पर्धेत राज्यासह महाराष्ट्रातील शेतकरी देखील आपल्या गाड्यांसह दाखल होतात. २२ हुन अधिक बैल-घोडा गाड्या या स्पर्धेत यंदा सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत ममदापुर येथील मुत्ताप्पा पुंडीबीज यांच्या गाडीने १३ मिनिटे २५ सेकंदात ३ किलोमीटरचा पल्ला पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकाविला. तर होळे हंगरगी येथील श्री मायम्मा देवी कमिटीच्या गाडीने १३ मिनिट ३२ सेकंदात पल्ला गाठून द्वितीय क्रमांक पटकाविला. तृतीय क्रमांकाचा बहुमान नापुर येथील राजू जैनापूर यांच्या गाडीने १३ मिनिटे ४७ सेकंदात पल्ला गाठत पटकाविला.
शेतकरी कोणत्याही मौसमात आपल्या शेतातील कामात व्यस्त असतो. शेतकऱ्यांच्या दैनंदिन आयुष्यात थोडासा बदल आणि विरंगुळा मिळविण्यासाठी आयोजित केलेल्या या आगळ्या वेगळ्या स्पर्धेमुळे शेतकऱ्यांच्यात नक्कीच नवी ऊर्जा निर्माण होते यात शंका नाही.


Recent Comments