भारतीय ज्ञान परंपरा केवळ श्रद्धेवर आधारित नसून ती एक सत्यशोधक प्रक्रिया आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी केले आहे. बेळगाव येथे गुरुदेव डॉ. आर. डी. रानडे यांच्या २८ पुस्तकांच्या महाग्रंथाचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते.


गुरुदेव डॉ. आर. डी. रानडे यांच्या समग्र ग्रंथांचे प्रकाशन करताना केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत पुढे म्हणाले की, जगातील सर्व तात्विक मार्ग परस्परांना पूरक आहेत, हे रानडे यांनी जगाला दाखवून दिले. जर ज्ञान मनुष्याला ईश्वराच्या जवळ घेऊन जात नसेल तर ते अपूर्ण आहे. सत्य ही कोणत्याही एका राष्ट्राची बौद्धिक संपदा नसून ती संपूर्ण मानवजातीची सामायिक परंपरा आहे. रानडे यांनी पाश्चात्य तात्विक परंपरेचा सखोल अभ्यास केला असला तरी त्यांनी भारतीय परंपरेचा गौरव नेहमीच जपला. विविध तात्विक मार्गांमध्ये कोणतीही स्पर्धा नसून ते एकमेकांना पूरक आहेत, असे केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी म्हटले.


बेळगावमधील हिंदवाडी येथील गुरुदेव रानडे मंदिर आणि टिळकवाडीतील जीआयटी कॉलेजच्या के. के. वेणुगोपाल सभागृहात या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एका भव्य ग्रंथदिंडीच्या सोहळ्याने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. याच प्रसंगी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते ‘शताब्दी सभागृहाचे’ भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख मंगेश भेंडे यांनी समारोपपर भाषण केले.

या महत्त्वपूर्ण सोहळ्याला माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, खासदार इराण्णा कडाडी, आमदार अभय पाटील, आरएसएसचे कार्यकारिणी सदस्य अरविंदराव देशपांडे, डॉ. रानडे यांचे नातू दीपक आपटे आणि अतुल जैन हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच विविध विद्यापीठांचे कुलगुरू डॉ. सी. एम. त्यागराज, डॉ. विष्णुकान्त चटपल्ली, डॉ. आनंद देशपांडे आणि सुधींद्र गणाचारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एसीपीआरचे अध्यक्ष अशोक निंबरगी यांनी भूषवले.


Recent Comments