कन्नड चित्रपट सृष्टी सॅन्डलवूड मधील अभिनेत्री संजना गलरानी आणि रागिणी यांनी ड्रग्ज सेवन केल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या चाचणीत सिद्ध झाले आहे. त्यांच्यासह वीरेन खन्ना, रविशंकर, लूम पेपर आणि राहुल तोनसे यांनीही मादकपदार्थ सेवन केल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे.
आपल्या मादक अदा आणि अभिनयाने रसिकांना घायाळ करणाऱ्या रागिणी आणि संजना गलरानी या काही दिवसांपूर्वी ड्रग्ज घेतल्यावरून लाइमलाईटमध्ये आल्या होत्या. फॉरेन्सिक लॅबोरेटरीच्या अहवालात त्यांनी ड्रग्ज सेवन केले होते यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या दोघींच्या डोक्यावरील काही केस हैदराबादच्या फॉरेन्सिक लॅबोरेटरीला ऑक्टोबर २०२०मध्ये चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. या चाचणीचा अहवाल सीसीबी पोलिसांना मिल असून, त्यात या दोघी दोषी आढळल्या आहेत. त्यांच्यासह वीरेन खन्ना, रविशंकर, लूम पेपर आणि राहुल तोनसे यांनीही मादकपदार्थ सेवन केल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे.
यासंदर्भात सीसीबीचे संयुक्त पोलीस आयुक्त संदीप पाटील पत्रकारांना माहिती देताना म्हणाले, सर्वसामान्यपणे ड्रग्ज सेवन केले की नाही याची परीक्षा करण्यासाठी रक्त व मूत्राचे नमुने प्रयोगशाळेला पाठवण्यात येतात. मात्र ड्रग्ज सेवनाच्या १-२ दिवसांत हे नमुने पाठवले तरच त्याचा छडा लागतो. त्यामुळे दोन्ही अभिनेत्रींचे काही केस चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांची चाचणी करून प्रयोगशाळेने या दोघीनी ड्रग्ज सेवन केल्यावर शिक्कामोर्तब केले आहे असे स्पष्ट केले. एकंदर जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेल्या रागिणी आणि संजना गलरानी या दोन्ही अभिनेत्रींच्या अडचणी एफएसएल अहवालामुळे पुन्हा वाढल्या आहेत. आता त्या कशाप्रकारे न्यायालयीन लढा देतात हे पहावे लागेल.
Recent Comments