पत्नीशी जवळीक असल्याच्या संशयातून पतीने मित्रावर अॅसिड हल्ला केल्याची घटना नेलमंगळ येथील मादानायकनहळ्ळी परिसरात घडली. या प्रकरणातील फरार आरोपी नवीन याला पोलिसांनी अटक केली आहे.

मादानायकनहळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बयादरहळ्ळी येथे हा प्रकार घडला. शशिकुमार असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून, नवीन याने त्याच्यावर अॅसिड फेकले.

खासगी वस्त्रनिर्मिती कारखान्यात काम करत असताना नवीनच्या पत्नीची शशिकुमारशी ओळख झाली होती. त्यांच्यात जवळीक वाढल्याच्या संशयातून नवीन संतप्त होता. बोलायचे असल्याचे सांगून त्याने शशिकुमारला फोन करून बोलावले. त्यानंतर अनैतिक संबंधांचा आरोप करत त्याच्यावर अॅसिड फेकून घटनास्थळावरून पळ काढला.
या हल्ल्यात शशिकुमारच्या चेहरा, पोट आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी मादानायकनहळ्ळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार नवीनला अटक करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.


Recent Comments