Chikkodi

चिकोडीच्या गटशिक्षणाधिकारीपदी प्रभावती पाटील यांची कायमस्वरूपी नियुक्ती

Share

चिकोडीच्या गटशिक्षणाधिकारीपदी प्रभावती पाटील यांची कायमस्वरूपी नियुक्ती झाली असून, त्यांनी पदभार स्वीकारला आहे. एसएसएलसी परीक्षेचा निकाल उंचावण्यासह गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या अडीच वर्षांपासून त्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. या काळात सहकार्य आणि मार्गदर्शन करणारे विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी, रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे आणि खासदार प्रियांका जारकीहोळी यांचे त्यांनी आभार मानले.

चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील आठ विभागांमध्ये चिकोडी तालुक्याला अग्रस्थान मिळवून देण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न केले आहेत. यंदाच्या एसएसएलसी परीक्षेतही चांगला निकाल मिळवण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या सहकार्याने प्रयत्न करणार असल्याचे प्रभावती पाटील यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांच्या विविध संघटना आणि राज्य सरकारी कर्मचारी संघटनेला विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी विविध पदांवर कार्यरत असताना शिक्षक, मुख्याध्यापक, संघटना आणि प्रसारमाध्यमांनी दिलेल्या सहकार्याचा त्यांनी उल्लेख केला. दोन ठिकाणचा प्रभारी कार्यभार असल्याने कामावर पुरेसे लक्ष देता येत नव्हते. आता एकाच तालुक्याची जबाबदारी असल्याने शाळा आणि शिक्षकांना सातत्याने मार्गदर्शन करणे शक्य होईल, असा विश्वास प्रभावती पाटील यांनी व्यक्त केला.

Tags: