Belagavi

परदेशात जाण्याच्या प्रयत्नात असलेला लेखक रवी हंज कोची विमानतळावर ताब्यात

Share

संत बसवेश्वर यांचा अवमान केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल असलेला ‘बसव मंटप’ पुस्तकाचा लेखक रवी हंज याला कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. परदेशात जाण्याच्या प्रयत्नात असताना विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेने त्याला रोखले.

संत बसवेश्वर यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या आरोपावरून रवी हंज याच्याविरोधात बेळगावच्या मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान तो देशाबाहेर जाऊ नये, यासाठी बेळगाव पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली होती.

या नोटिशीनुसार कोची विमानतळावरून परदेशात जाण्याच्या तयारीत असलेल्या रवी हंज याला विमानतळ अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. याची माहिती बेळगावच्या मार्केट पोलिसांना देण्यात आली असून, त्याला कोचीहून बेळगावला आणण्यासाठी पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Tags: