पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीही जनतेसमोर येऊन संवाद साधलेला नाही किंवा आमच्या प्रश्नांना उत्तरे दिलेली नाहीत, अशी टीका कृषिमंत्री पी. एम. नरेंद्रस्वामी यांनी केली.
धारवाड येथे बोलताना नरेंद्रस्वामी म्हणाले की, लोकशाहीमध्ये सर्वांसमोर येऊन संवाद साधणे अपेक्षित असते. मात्र, पंतप्रधान मोदी हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असून त्यांनी लोकशाही व्यवस्थेलाच बगल दिली आहे. फोन टॅपिंगच्या मुद्द्यावर आमचे नेते राहुल गांधी यांनी केलेले विधान खोटे नाही. खोटे बोलणे हे भाजपचे काम असल्याचा आरोपही त्यांनी केला.

भाजपने केंद्रात सत्तेवर येताना प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. खोटे बोलण्यात भाजप तरबेज असून देशाचा विकास करण्याच्या बाता मारणाऱ्या भाजपने कोणत्या क्षेत्रात विकास केला, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसने देशातील विविध क्षेत्रांत केलेल्या कामगिरीच्या आधारावरच भाजप राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
एसआयआरच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली. एसआयआरमध्ये काय घडले आहे, हे सर्वांना माहीत आहे. भाजपचेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एसआयआरबाबत भूमिका मांडली आहे. मात्र, आम्ही त्याच मुद्द्यावर बोललो तर आमच्यावर आक्षेप घेतला जातो. आता भाजपचेच नेते याबाबत बोलत असताना पक्ष यावर काय उत्तर देणार, असा प्रश्न नरेंद्रस्वामी यांनी उपस्थित केला.


Recent Comments