बेळगाव शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवले नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या भाजप आमदारांना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी महापालिकेतील सत्तेची आठवण करून देत प्रत्युत्तर दिले.
बेळगाव शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना मंत्री जारकीहोळी म्हणाले की, रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे महापालिकेत सध्या कोणाची सत्ता आहे, याचे भान भाजप आमदारांनी ठेवावे. यापूर्वी त्यांचे सरकार असताना ७० टक्के निधी दक्षिण कर्नाटकात वळवण्यात आला. उत्तर कर्नाटकात भाजपचे आमदार असूनही पुरेसा निधी देण्यात आला नाही, असा आरोप त्यांनी केला. प्रत्येक प्रश्नावर राज्यपाल आणि राष्ट्रपतींना पत्र लिहिण्यापेक्षा आधी रस्त्यांची सुधारणा करावी, असा टोलाही त्यांनी लगावला. जलजीवन मिशनअंतर्गत केंद्राकडून मिळणारा १० हजार कोटी रुपयांचा निधी अद्याप मंजूर झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेतील करगळती रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ऊस उत्पादकांच्या मागण्या आणि दरनिश्चितीबाबत बोलताना ते म्हणाले की, साखर विक्रीतील नफ्याच्या सूत्रानुसार सर्व कारखाने शेतकऱ्यांना दर देत आहेत. यापूर्वी साखरेचा दर ४५ रुपये गृहीत धरून उसाला ३,६०० रुपये दर निश्चित करण्यात आला होता. आता साखरेचा दर ५० रुपये गृहीत धरून दर जाहीर करण्यात आला आहे. साखर ५० रुपयांपेक्षा अधिक दराने विकली गेल्यास शेतकऱ्यांना उसासाठी ४,००० रुपये दर मिळेल. उसाच्या उताऱ्यानुसार तसेच जिल्हानिहाय दर निश्चित केले जात असल्याने सर्व जिल्ह्यांना एकसमान दर देणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बेळगाव जिल्हा विभाजन आणि अधिवेशनाबाबत बोलताना जारकीहोळी म्हणाले की, बेळगाव जिल्ह्याचे विभाजन व्हावे, अशी भूमिका असून गोकाक आणि चिकोडी या स्वतंत्र जिल्ह्यांचे प्रस्ताव आहेत. मात्र, अधिवेशनाच्या वेळी बैलहोंगल, अथणी, रामदुर्ग यांसह विविध भागांतून स्वतंत्र जिल्ह्यांची मागणी पुढे येते. त्यामुळे या विषयावर एकमत होत नसल्याने विभाजनाचा निर्णय रखडला आहे. मागील बेळगाव अधिवेशनात सरकारने जनतेच्या मागण्यांना प्रतिसाद दिल्याने आंदोलनांची संख्या कमी झाली होती, असेही त्यांनी सांगितले.
सुवर्णसौधच्या वीजबिलाच्या थकबाकीबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, राज्यातील पाच वीज कंपन्यांकडे एकूण १० हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी सुवर्णसौधचे केवळ ११ लाख रुपये वीजबिल थकीत आहे.


Recent Comments