Belagavi

बेळगावातील विद्यार्थिनींच्या वसतिगृहात मोफत अन्नदासोहाला प्रारंभ

Share

अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेने बेळगावमध्ये उभारलेल्या गरजू विद्यार्थिनींच्या मोफत वसतिगृहात गुब्बी तोटदप्पा धर्मसंस्थेच्या सहकार्याने अन्नदासोहाला प्रारंभ करण्यात आला.

महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या उपक्रमाचे उद्घाटन झाले.

यावेळी बोलताना डॉ. कोरे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून बेळगावमध्ये वीरशैव लिंगायत समाजातील गरजू विद्यार्थिनींना वसतिगृहात प्रवेश देऊन त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, मोफत भोजनाची व्यवस्था नसल्याने विद्यार्थिनींना जेवणासाठी बाहेर जावे लागत होते. या सुविधेसाठी अनेक दानशूरांनी पुढाकार घेतला होता. दरम्यान, बंगळुरू येथील रावबहादूर धर्मप्रवर्तक गुब्बी तोटदप्पा धर्मसंस्थेशी संपर्क साधल्यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वसतिगृहाला भेट देऊन पाहणी केली आणि अन्नदासोहासाठी सहकार्य केले. सध्या या वसतिगृहात ८४ विद्यार्थिनी राहून शिक्षण घेत आहेत. आता त्यांना भोजनासाठी बाहेर जावे लागणार नसून वसतिगृहातच भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सहकार्यासाठी त्यांनी गुब्बी तोटदप्पा धर्मसंस्थेचे आभार मानले.

महासभेच्या जिल्हाध्यक्ष रत्नप्रभा बेल्लद म्हणाल्या, उच्च शिक्षणासाठी दूरच्या गावांतून बेळगावला येणाऱ्या समाजातील गरजू मुलींसाठी मोफत वसतिगृह उभारण्याचा संकल्प डॉ. प्रभाकर कोरे आणि महासभेने केला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक दानशूरांच्या सहकार्याने वसतिगृह सुरू झाले. विद्यार्थिनींना मोफत भोजनाची सुविधा उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य होते. गुब्बी तोटदप्पा धर्मसंस्थेच्या सहकार्यामुळे हा उपक्रम सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. गुरुदेवी हुलेप्पनवरमठ यांनी, शतकानुशतकांची अन्नदानाची परंपरा असलेल्या बंगळुरूच्या गुब्बी तोटदप्पा धर्मसंस्थेने उत्तर कर्नाटकातील बेळगावमध्येही सेवाकार्य सुरू करणे अभिमानास्पद असल्याचे सांगितले. समाजातील मुलींच्या कल्याणासाठी या संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण असून अन्नदान सेवा नियमित सुरू राहावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी महासभेचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ विधिज्ञ मारुती झिरली, आर. पी. पाटील, व्ही. के. पाटील, सोमलिंग माविनकट्टी, प्रीती दोडवाड, अंजना कित्तूर, ज्योती बादामी, राजेश्वरी कवटगीमठ, सरोजनी निशानदार, महांतेश मेणसिनकाई आदी उपस्थित होते. शैलजा संसुद्धी यांनी प्रार्थना केली, तर आशा यमकनमर्डी यांनी सूत्रसंचालन केले.

Tags: