खानापूर तालुक्यातील नंदगड येथील अंगणवाडी केंद्रात चाचा नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नेहरूंच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
नंदगड येथील प्रभाग क्रमांक ४ मधील १९० क्रमांकाच्या अंगणवाडी केंद्रात शिक्षिका रवीणा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनकार्याची माहिती बालकांना देऊन त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर नृत्य आणि विविध मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

चाचा नेहरू यांच्याप्रमाणे पांढरे कपडे आणि गुलाबाचे फूल परिधान करून आलेल्या चिमुकल्यांनी कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी आशा कार्यकर्त्या तसेच अंगणवाडीतील बालकांचे पालक उपस्थित होते. त्यांनीही मुलांच्या आनंदात सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद घेतला.


Recent Comments