Khanapur

खानापूर तालुक्यातील वाळू वाहतूक बंदीविरोधात सोमवारी रास्ता रोको

Share

खानापूर तालुक्यात वाळू वाहतूक बंद असल्याने व्यावसायिक आणि कामगार आर्थिक संकटात सापडले आहेत. या बंदीच्या निषेधार्थ आणि सरकारच्या दुर्लक्षाविरोधात सोमवारी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्थानिक नेते आणि विविध संघटनांच्या उपस्थितीत झालेल्या पूर्वनियोजन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

खानापूर तालुक्यात पारंपरिक वाळू व्यवसाय आणि वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वीटभट्टी, सेंट्रिंग तसेच बांधकाम व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेकडो कुटुंबांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्याच्या इतर भागांत वाळू उपलब्ध असताना केवळ खानापूर तालुक्यातच निर्बंध का, असा सवाल उपस्थित करीत वाळू वाहतुकीवरील बंदी तातडीने उठविण्याची मागणी स्थानिक नेत्यांनी केली आहे.

यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देऊनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष अँड. ईश्वर घाडी आणि अन्य प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. वीट आणि वाळू व्यवसायावर अवलंबून असलेले शेतकरी, कामगार, व्यापारी तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: