कागवाड तालुक्यातील शेडबाळ येथे राष्ट्रसंत आचार्य विद्यानंद मुनी महाराज यांच्या स्मरणार्थ सुमारे २.५० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे बुधवारी भूमिपूजन करण्यात आले.

नवी दिल्ली येथील कुंदकुंद भारती ट्रस्टचे अध्यक्ष सतीश जैन, सचिव अनिल जैन, कोषाध्यक्ष विवेक जैन आणि सहकोषाध्यक्ष राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत धार्मिक विधींसह स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला.


यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सतीश जैन म्हणाले, आचार्य विद्यानंद मुनी महाराज यांनी विश्वशांतीसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांचे आदर्श बालक आणि तरुण पिढीला प्रेरणादायी ठरावेत, या उद्देशाने स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकात त्यांच्या चरणपादुकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार असून, बालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्तम संस्कार रुजविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ट्रस्टचे कोषाध्यक्ष विवेक जैन यांनीही आचार्य विद्यानंद मुनी महाराज यांनी दाखविलेल्या मार्गावर समाजाने वाटचाल करावी आणि तरुण पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने कुंदकुंद भारती ट्रस्ट विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगितले.
समारंभाला आर्यिका गुरुवाणी माताजी, सुमतिश्री माताजी, विशालाक्षी माताजी आणि नमितसागर मुनी महाराज यांचे सान्निध्य लाभले. पावन वर्षायोग चातुर्मासाच्या विसर्जनानिमित्त पिंच्छी प्रदान कार्यक्रमही पार पडला.
कर्नाटक राज्य जैन असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि आचार्य विद्यानंद मुनी महाराज स्मारक समितीचे संयोजक शीतलगौडा पाटील म्हणाले, आचार्य विद्यानंद मुनी महाराज हे शेडबाळचे सुपुत्र होते. जैन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी देशभर भ्रमण करून अहिंसा आणि धार्मिक तत्त्वांचा प्रसार केला. त्यांचे आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी स्मारकाची उभारणी महत्त्वाची आहे. या कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
सकाळी शांतिसागर आश्रमातील पद्म हत्तीच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शांतिनाथ जैन मंदिरात धार्मिक विधी पार पडले. समाजाचे प्रतिष्ठाचार्य अजितकुमार उपाध्ये, आनंद उपाध्ये, भरत उपाध्ये आणि बाहुबली उपाध्ये यांच्यासह अन्य पुरोहितांनी पूजाविधी करून पाहुण्यांच्या हस्ते पायाभरणी केली.
समारंभाला आचार्यश्री विद्यानंद स्मारक समितीचे सदस्य, शेडबाळ बँकेचे संचालक भरत पाटील, अभियंते अनिल कनवाडे, महावीर लगारे, निम्मगोंडा पाटील, शांतिसागर आश्रमाचे अध्यक्ष राजू नांद्रे आणि विद्यानंद शिक्षण संस्थेचे प्रमुख प्रकाश नांद्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पावन वर्षायोग चातुर्मास कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य करणाऱ्या श्रीकृष्ण शिक्षण विकास समितीच्या महिला सदस्य, चक्रेश्वर महिला मंडळ आणि विद्यानंद महिला मंडळाच्या सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.


Recent Comments