बेळगाव येथे २ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी ४ हजारांहून अधिक पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

२ ते ११ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. बाहेरील जिल्ह्यांतून सुमारे ४ हजार एससीपीसी कर्मचारी, ५०० हून अधिक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक तसेच वरिष्ठ आयपीएस अधिकारी तैनात राहणार आहेत. त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था विविध मंगल कार्यालयांत करण्यात येत आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत सुवर्णसौधच्या तीन किलोमीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अन्वये जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. परिसरात ६०० सीसीटीव्ही कॅमेरे, बॅरिकेडिंग आणि फिरते कमांड सेंटर सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
आंदोलनांसाठी स्वतंत्र ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. ५०० जणांपर्यंतच्या आंदोलनांसाठी मच्छे बायपास, तर ३ हजारांहून अधिक लोकांच्या आंदोलनांसाठी धारवाड नाका येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आंदोलकांच्या मागण्या आणि समस्यांवर तोडगा काढण्यासाठी एसीपी, डीसीपी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.
या पाहणी बैठकीला डीसीपी नारायण बरमनी आणि निरंजन राजे अरस उपस्थित होते.


Recent Comments