विजापूरमध्ये पुन्हा गोळीबाराची घटना घडली असून, दिवसाढवळ्या एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यासीन ठक्के असे मृताचे नाव आहे. डीजेच्या आवाजावरून झालेल्या जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चार विशेष पथके तयार केली आहेत.

विजापूर शहरातील मुंडेवाडी रुग्णालयाजवळ ही घटना घडली. पत्नीसमवेत दुचाकीवरून जात असलेल्या यासीन ठक्के याच्यावर दुचाकीस्वार हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला. दोन गोळ्या झाडून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. यातील गोळ्या यासीनच्या छातीत लागल्याने अतिरक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गांधी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. घटनास्थळी दोन रिकामी काडतुसे आढळली. मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.


या हत्येमागे जुन्या वादाची पार्श्वभूमी असल्याचा संशय आहे. काही दिवसांपूर्वी डीजेच्या आवाजावरून यासीन आणि दुसऱ्या गटात वाद झाला होता. त्याचाच राग मनात धरून ही हत्या करण्यात आली असावी, या दिशेने पोलिस तपास करत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आरोपींच्या शोधासाठी चार विशेष पथके स्थापन केली असून, शहरातील प्रमुख भागांत पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

विजापूर जिल्ह्यात यापूर्वीही टोळीयुद्ध, गोळीबार आणि गुन्हेगारी गटांमधील वैमनस्यातून अनेकांचे बळी गेले आहेत. भीमा नदीकाठच्या परिसरातील टोळीयुद्धाचा इतिहासही याची साक्ष देतो. आता डीजेच्या आवाजावरून झालेल्या किरकोळ वादातून गोळीबार आणि हत्या झाल्याने शहरातील वाढत्या बंदूक संस्कृतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
किरकोळ कारणांवरून पिस्तुलाचा वापर करून जीव घेण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जात असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. सार्वजनिक ठिकाणी पिस्तुले सहज उपलब्ध होत असतील, तर ही कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. अवैध शस्त्रांच्या पुरवठ्यावर नियंत्रण आणून अशा घटनांना आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. यासीनच्या हत्येतील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.


Recent Comments