Belagavi

महिला सक्षमीकरणासाठी आमदार अभय पाटील यांचा पुढाकार; १५३ महिलांना शिलाई मशीनचे वितरण

Share

बेळगाव दक्षिण मतदारसंघात महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी आमदार अभय पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. १५३ महिलांना मोफत शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले असून, आगामी काळात विविध गृहउद्योगांसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.

बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते देवराज अर्स विकास महामंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात १५३ पात्र महिला लाभार्थींना मोफत शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले. महिलांनी आर्थिक परावलंबित्व सोडून स्वावलंबी जीवन जगावे, या उद्देशाने २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या तीन आर्थिक वर्षांत ही योजना राबविण्यात आल्याचे आमदारांनी सांगितले.

केवळ यंत्रसामग्रीचे वितरण करून न थांबता, लाभार्थी महिलांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या व्यवसायासाठी नियमित कामाच्या ऑर्डर मिळवून देण्याचे प्रयत्नही स्थानिक प्रशासनाकडून केले जात आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध गृहउद्योग प्रोत्साहन योजना राबविण्याचे नियोजन आहे. शिलाई मशीनबरोबरच शेवया तयार करण्याची यंत्रे, लघु वीट निर्मिती उद्योग आणि ज्यूस सेंटर सुरू करण्यासाठी महिलांना आर्थिक मदत व तांत्रिक मार्गदर्शन दिले जाणार आहे.

विशेषतः आगामी काळात सुमारे १०० इलेक्ट्रॉनिक ज्यूस सेंटर सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे. यामध्ये शहाळ्याचे पाणी, उसाचा रस आणि चहा विक्री केंद्रांचा समावेश असेल. या व्यवसायांसाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. कोणताही अतिरिक्त व्याजाचा भार न पडता महिलांना केवळ कर्जाची मूळ रक्कम बँकेला परत करावी लागेल, अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले.

यावेळी महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, नगरसेवक तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

Tags: