बेंगळुरूतील पिंक लाइन मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्राकडे मदतीची मागणी केली. यावर कर्नाटकच्या विकासात कोणताही भेदभाव नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

बेंगळुरू येथे झालेल्या पिंक लाइन मेट्रोच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. गेल्या ७० वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी पावसाची नोंद राज्यात झाली असून, गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले. राज्यातील बहुतांश तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असून, सुमारे ८५ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) अंतर्गत कर्नाटकला २२ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली.


याशिवाय, २०१९ पासून स्थिर असलेल्या साखरेच्या किमान विक्री किमतीत सुधारणा करावी, इथेनॉलच्या वाटपात राज्याला न्याय्य वाटा मिळावा आणि ऊस उत्पादकांच्या मागणीनुसार प्रतिटन उसाला ५,५०० रुपये दर निश्चित करण्यासाठी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही शिवकुमार यांनी केली. या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन येण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या मागण्यांना उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या विकासात केंद्र सरकार कोणताही भेदभाव करत नसल्याचे स्पष्ट केले. बेंगळुरू मेट्रोच्या विस्ताराचा उल्लेख करताना ते म्हणाले, २०१४ मध्ये नम्मा मेट्रोचे जाळे केवळ १७ किलोमीटर होते. आज ते १०० किलोमीटरचा टप्पा ओलांडत आहे. आपण शतक पूर्ण करत आहोत, मुख्यमंत्री शिवकुमार यांनीही याकडे लक्ष द्यावे, असे मिश्किलपणे म्हणत त्यांनी हसू फुलवले.
मेट्रोच्या विस्तारासाठी केंद्र सरकार पूर्णपणे कटिबद्ध असून, यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांना मोठा लाभ होणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. बेंगळुरू हे देशाचे सिलिकॉन व्हॅली असून, भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन म्हणून काम करत आहे, असे त्यांनी नमूद केले. चिपपासून जहाजापर्यंत देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळत असून, बेंगळुरूमध्ये कार्यरत असलेली कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) केंद्रे विकसित भारताच्या प्रवासाला बळ देत असल्याचेही त्यांनी सांगितले.


Recent Comments