Belagavi

केवळ यशाच्या मागे न धावता जीवनाचे सार्थक साधा : बसवराज बोम्मई

Share

तरुणांनी केवळ यशाच्या मागे न धावता जीवनाचे खरे सार्थक ओळखून श्रेष्ठ कामगिरी करावी, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि खासदार बसवराज बोम्मई यांनी केले.

बेळगावात अकॅडमी ऑफ कम्पॅरेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलिजन संस्थेच्या वतीने आयोजित डॉ. आर. डी. रानडे स्मृती व्याख्यान आणि पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यश-अपयश, जय-पराजय आणि सुख-दुःख अशा प्रत्येक परिस्थितीत जीवन जगण्याचे निश्चित सूत्र शोधले पाहिजे. हे सूत्र जितक्या लवकर समजेल, तितक्या लवकर जीवनाचे सार्थक साधता येईल. निसर्गात असमानता असली तरी माणसाने आपल्या विचारांतून आणि वर्तनातून भेदभाव निर्माण करू नये. परस्परांचा आदर करून समभाव जोपासला पाहिजे, असे बोम्मई म्हणाले.

डॉ. रानडे यांच्या तत्त्वज्ञानानुसार एकच जग, एकच ईश्वर आणि एकच मानवता ही संकल्पना महत्त्वाची आहे. मात्र, या ध्येयापर्यंत पोहोचण्याचे मार्ग आणि तत्त्वज्ञान वेगवेगळे असू शकतात. विविध धर्म आणि तत्त्वज्ञानांचा तुलनात्मक अभ्यास करून समान विचारांचा पाया शोधला पाहिजे. बेळगावातील संबंधित संस्था हे महत्त्वपूर्ण कार्य करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

चाणक्यांचे अर्थशास्त्र आजही प्रासंगिक आहे. अर्थशास्त्रात लाभ-हानीचा, तर तत्त्वज्ञानात पाप-पुण्याचा विचार केला जातो. या दोन्हींचा समन्वय साधणे ही जीवनातील श्रेष्ठ कामगिरी आहे. तसेच भूक, जाणीव, विस्मरण आणि मृत्यू या माणसाला मिळालेल्या चार महत्त्वाच्या देणग्या असल्याचे त्यांनी सांगितले.

बसवेश्वरांच्या ‘कायकवे कैलास’ तत्त्वानुसार प्रत्येकाने कर्तव्य पार पाडावे. ‘दया हेच धर्माचे मूळ’ या विचारानुसार इतरांप्रती करुणा असावी. बुद्ध, बसवेश्वर, शंकराचार्य, स्वामी विवेकानंद आणि महावीर यांसारख्या महान व्यक्तींनी त्याग आणि एकाग्रतेतून समाजाला दिशा दिली. मृत्यूनंतरही आपल्या कार्यातून जिवंत राहतो, तोच खरा साधक असल्याचे सांगत तरुणांनी जीवनाचे सार्थक साधावे, असे आवाहन बोम्मई यांनी केले.

यावेळी आमदार अभय पाटील, डॉ. अश्वरी उदय बापट, अशोक एम. पोतदार, मारुती बी. जिरली यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Tags: