Belagavi

केएसआयआयडीसीच्या राज्य संचालकपदी मल्लेश चौगुले यांची नियुक्ती

Share

कर्नाटक राज्य औद्योगिक व पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (केएसआयआयडीसी) राज्य संचालकपदी बेळगावचे मल्लेश चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सुमारे ५४ वर्षांपूर्वी मुंबईत भारतीय दलित पँथर संघटनेचे युवा नेते म्हणून त्यांनी कार्याला सुरुवात केली. तेव्हापासून दलित चळवळ, सामाजिक न्याय, समाजातील समानता आणि युवकांच्या संघटनासाठी ते सक्रिय आहेत. काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष तसेच काँग्रेसच्या एससी-एसटी विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीच्या एससी विभागाच्या संघटनात्मक कार्यातही त्यांचा सहभाग राहिला आहे.

सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना मलेशियातील क्वालालंपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याशिवाय भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार आणि कर्नाटक सरकारचा राज्य युवा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. सध्या ते नवी दिल्लीतील अखिल भारतीय दलित युवा संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून, राज्य सरकारच्या विविध समित्यांवरही त्यांनी काम केले आहे.

या नियुक्तीसाठी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी शिफारस आणि समर्थन दिल्याचे सांगण्यात येते. पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या नियुक्तीस पाठिंबा दिला.

जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष बसवराज शेगावी, शहर काँग्रेस अध्यक्ष राजा सलीम, मृणाल हेब्बाळकर, राहुल जारकीहोळी यांच्यासह अन्य नेत्यांनीही शिफारस केल्याचे समजते. या नियुक्तीमुळे बेळगाव जिल्ह्यातील सामाजिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त होत असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून चौगुले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Tags: