विजापूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील तडलग गावात जमिनीच्या वादातून दोन गटांत भरदिवसा झालेल्या संघर्षात दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.
तडलग येथील हनुमव्वा मेटी यांच्या मालकीची सुमारे १० एकर जमीन त्याच गावातील सालोटगी कुटुंबाने भाडेपट्ट्याने घेतली होती. या जमिनीत त्यांनी ऊस लागवड केली होती. मात्र, जमिनीत आपलाही हिस्सा असल्याचा दावा हनुमव्वा यांच्या नातेवाइकांनी केल्याने दोन्ही गटांत वाद निर्माण झाला होता.

यंदाचा ऊस कापून नेल्यानंतर पुढील वर्षापासून जमीन भाडेपट्ट्याने घेणार नसल्याचे सालोटगी कुटुंबीयांनी सांगितले होते. मात्र, हनुमव्वा यांच्या नातेवाइकांनी त्याला विरोध केला होता. आज सालोटगी कुटुंबीय ऊसतोडणीसाठी शेतात गेले असता दोन्ही गटांत शाब्दिक वाद झाला. त्यानंतर वादाचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले. दोन्ही गटांतील लोकांनी दगड, लाकडे आणि काठ्यांनी एकमेकांवर हल्ला केला.
या हल्ल्यात सालोटगी कुटुंबातील हनुमंत यांच्यासह दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी विजापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच कोल्हार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. जमिनीचा वाद हे या घटनेमागील प्राथमिक कारण असल्याचे सांगण्यात येत असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. ही घटना कोल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.


Recent Comments