जैन धर्माच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याने सरकारला अंतिम इशारा देण्यासाठी येत्या ४ डिसेंबर रोजी चिक्कोडी येथून पदयात्रा सुरू करण्यात येईल आणि तीन दिवसांत बेळगावला पोहोचू, अशी घोषणा जैन आचार्य श्री गुणधरनंदी महाराज यांनी केली.
या मुदतीत सरकारने मागण्या मान्य न केल्यास सुवर्ण सौधसमोर सत्याग्रह करून देहत्याग करण्याचा कठोर इशारा त्यांनी हुबळी तालुक्यातील वरूर गावात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

जैन विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी सरकारकडे अनेकदा निवेदने देऊनही कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. मूळचे कर्नाटकातील अनेक जैन बांधव अत्यंत गरीब असून त्यांना आपल्या मुलांना शिक्षण देणेही कठीण झाले आहे. यासंदर्भात मंत्री संतोष लाड, लक्ष्मण सवदी, सतीश जारकीहोळी आणि माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याशी चर्चा होऊनही सरकारने दुर्लक्ष केले आहे. या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी १९ नोव्हेंबर रोजी बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील तेरदाळ येथे समाजाच्या नेत्यांची बैठक होणार असून कागवाड व अथणी येथील आमदारांना निवेदन दिले जाईल, असे महाराजांनी स्पष्ट केले.
जैन मुनींच्या विहारादरम्यान स्थानिक शाळांमध्ये रात्रीच्या निवासाची सोय करण्याची मागणी शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांच्याकडे केली होती, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद न देता संन्याशांचा अपमान केला आहे. साधी सौजन्याची विचारपूसही न करणाऱ्या शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अन्यथा त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाराजांनी दिला. तसेच गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी जैन संन्याशांना आवश्यक सुरक्षा पुरवावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.


Recent Comments