हुबळी तालुक्यातील गुडेनकट्टी येथे अचानक लागलेल्या आगीत चार गंज्या जळून खाक झाल्या आहेत. या दुर्घटनेत साठवलेला चारा आणि धान्य भस्मसात झाल्याने शेतकऱ्यांचे सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

गावातील शेतकऱ्यांच्या भुशाच्या गंज्यांना अचानक आग लागली आणि काही क्षणांतच तिने रौद्र रूप धारण करत चार गंज्यांना वेढले. या आगीत चारा व दवसधान्य पूर्णपणे जळाल्याने संबंधित शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

आग लागल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत ती विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने ती आटोक्यात येऊ शकली नाही. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
या आगीत शीतल नागरहळ्ळी, शिवानंद, तंग्यम्मनवर आणि यल्लप्पा कलिवाळ यांच्या गंज्या जळून खाक झाल्या असून, अंदाजे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामलेखाधिकारी बसवराज माडळ्ळी यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला.


Recent Comments