Chikkodi

चिक्कोडीत रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात ‘करवे’चे रास्ता रोको आंदोलन

Share

शहरातून जाणाऱ्या रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजवून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी गोटूर -कागवाड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

चिक्कोडी शहरातील मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावून प्रशासनाचा निषेध नोंदवला.

यावेळी बोलताना ‘करवे’चे अध्यक्ष संजू बडिगेर आणि समाजसेवक चंद्रकांत हुक्केरी यांनी, गुटूर-कागवाड रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. मात्र रस्त्याची चाळण झाली असतानाही अधिकारी दुर्लक्ष करत आहेत, असे सांगितले. वारंवार होणाऱ्या लहान-मोठ्या अपघातांमुळे नागरिक त्रस्त असल्याचे त्यांनी नमूद केले.

या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. प्रशासनाने लवकरात लवकर रस्त्याची डागडुजी न केल्यास राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Tags: