बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत बिघडलेल्या मुख्य रस्त्याच्या विकास कामाचा अखेर शुभारंभ झाला आहे.

मार्कनकोप्पा, देवरशिगीहळ्ळी आणि कॅरकोप्पा या गावांतील नागरिकांची बहुप्रतिक्षित मागणी लक्षात घेऊन कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी सुमारे ६ कोटी रुपये खर्चाच्या रस्ता नूतनीकरण कामाला मंजुरी मिळवून देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे.

हा रस्ता कित्तूर आणि खानापूर या दोन तालुक्यांना जोडण्यासोबतच राष्ट्रीय महामार्गालाही जाऊन मिळतो. या मार्गावरून दररोज विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिक ये-जा करतात. मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.

गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही मतदारसंघांतील नागरिक या मुख्य रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करत होते. अखेर आमदार बाबासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे निधी मंजूर होऊन कामाला सुरुवात झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र दुसरीकडे खानापूर मतदारसंघातील नागरिक आपल्या लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे स्थानिक पातळीवर बोलले जात आहे.

विकास कामाबाबत बोलताना आमदार बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, या रस्त्याचे भूमिपूजन आधीच होणार होते, परंतु काही कारणांमुळे विलंब झाला. या रस्ता विकासामुळे अनेक गावांचा प्रवास सुलभ होणार आहे. तसेच मरकट्टी गावातील बसस्थानकाच्या दुरवस्थेवर बोलताना त्यांनी आगामी काळात तिथे नवीन बसस्थानक उभारले जाईल, असे आश्वासन दिले.


Recent Comments