बेळगावातील कन्नड साहित्य भवनाच्या आवारात आयोजित ९९ व्या नाडहब्बा उत्सवाचे उद्घाटन प्रादेशिक आयुक्त के.एम. जानकी यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाले.

देवीच्या आराधनेसोबतच संस्कृती आणि भाषा टिकवून ठेवण्याचे काम नवरोत्सव करतो. बेळगावसारख्या सीमाभागात भाषा आणि कन्नड साहित्य टिकवून ठेवण्यासाठी गेल्या ९९ वर्षांपासून स्थानिकांनी स्वतःच्या बळावर व वैयक्तिक देणग्या जमा करून हा ५ दिवसांचा उत्सव सातत्याने चालवला आहे, ही गोष्ट अत्यंत कौतुकास्पद आहे. ५ दिवस चालणारा हा महोत्सव लोकांना सांस्कृतिक मेजवानी देण्यासोबतच कन्नड भूमीची श्रीमंत परंपरा आणि सांस्कृतिक वैभव भावी पिढीला परिचित करून देण्याचे एक उत्तम व्यासपीठ ठरेल, असे प्रादेशिक आयुक्त के.एम. जानकी म्हणाल्या.

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री तथा खासदार जगदीश शेट्टर म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून मी या नाडहब्बा उत्सवात सहभागी होत आहे. ९९ वर्षे ही परंपरा सातत्याने चालू ठेवणे ही सर्व बेळगावकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. म्हैसूरमध्ये जसा दसरा उत्सव साजरा होतो, त्याच धर्तीवर बेळगावचा नाडहब्बा उत्सवही अत्यंत वैभवाने पार पडला पाहिजे. या नाडहब्बा उत्सवाचे पुढील वर्ष हे १०० वे वर्ष असणार आहे. त्यामुळे हा १०० वा नाडहब्बा उत्सव अतिशय भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी आतापासूनच नियोजन व तयारी सुरू केली पाहिजे. धर्म, अध्यात्म आणि सांस्कृतिक परंपरेचे रक्षण करणाऱ्या अशा कार्यक्रमांना सर्वांनी पाठबळ दिले पाहिजे. ‘वंदे मातरम्’ हे गीत अनेक स्वातंत्र्यसैनिकांना व देशवासीयांना स्फूर्ती देणारे आहे, त्याला जात, धर्म किंवा रंगाच्या दृष्टिकोनातून न पाहता आपण सर्व भारतीय आहोत ही एकतेची भावना जपावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास गदग तोंटदर्य मठाचे डॉ. सिद्धाराम स्वामीजी यांचे दिव्य सान्निध्य लाभले. स्वामीजी म्हणाले, कावेरीपासून गोदावरीपर्यंत कन्नड भूमीचा विस्तार होता असा ऐतिहासिक उल्लेख आहे. सीमाभागात लोकसंख्येच्या आधारावर भाषिक क्षेत्रांवरून विवाद निर्माण करण्याऐवजी कन्नड आणि मराठी भाषिकांनी परस्परांबद्दल आदर व सौहार्द जोपासून दोन्ही भाषांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि सांस्कृतिक सामंजस्य बळकट केले पाहिजे. तसेच स्वातंत्र्यलढ्यात ‘वंदे मातरम्’ गीताने महत्त्वाची भूमिका बजावली असून या संपूर्ण गीताचे ऐतिहासिक महत्त्व सर्वांनी समजून घेतले पाहिजे आणि ते पूर्ण गायला कोणताही अडथळा नसावा.

या कार्यक्रमात निवृत्त प्राचार्य डॉ. बसवराज जगजंपी यांनी ‘वंदे मातरम्’ या विषयावर व्याख्यान दिले.
या प्रसंगी खासदार जगदीश शेट्टर, उत्सव समिती अध्यक्ष डॉ. एच.बी. राजशेखर, डॉ. सी.के. जोरापूर, सोमलिंग माविनकट्टी, अन्नपूर्णा हिरेमठ, ज्योती बदामी, विजया हिरेमठ, आर.पी. पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एच.आय. तिम्मापूर यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष आर.पी. पाटील यांनी मानले.


Recent Comments