Kagawad

उसाला ५,५०० रुपये दरासाठी १३ ऑक्टोबरपासून ‘टोल बंद’ची हाक

Share

उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर आणि इथेनॉलला प्रतिलीटर ७० रुपये भाव मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.

पावसाच्या तुटवड्यामुळे पिकांचे नुकसान झाले असून केंद्र सरकारने एफआरपी दरात वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी हसिरू सेना शेतकरी संघटनेचे गौरव अध्यक्ष शशिकांत गुरुजी यांनी केली. कागवाड येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभागृहात आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. १२ ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास १३ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व टोलनाक्यांवर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले की, देशातील निम्म्याहून अधिक साखर उत्पादन कर्नाटक आणि महाराष्ट्रात होते. येत्या सणासुदीच्या काळात साखरेचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकार साखर कारखाने घाईघाईने सुरू करण्याचे निर्देश देत आहे. मात्र, कारखाने लवकर सुरू झाल्यास उसाचा उतारा आणि वजन घटून शेतकऱ्यांचे प्रतिॲकर नुकसान होईल. त्यामुळे योग्य निर्णय होईपर्यंत कारखाने सुरू करू नयेत, अशी मागणी त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर १० ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे शेतकऱ्यांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

हसिरू सेना शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चुनप्पा पुजारी यांनी सांगितले की, हुबळी येथील मेळाव्यात ५ लाख शेतकरी एकत्र आले होते. ११ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १३ ऑक्टोबरपासून महामार्ग रोखून धरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रातील सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असे हसिरू सेना शेतकरी संघटनेचे गौरव अध्यक्ष शशिकांत गुरुजी यांनी म्हटले.

मेळाव्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिव राजेंद्र गड्डनावर, बसप्पा चन्नगुंडी, कागवाड तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद पाटील, ॲड. काका पाटील, राहुल कटगेरी, महादेव उदगावे, अजित करवे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

सुकुमार बन्नूरे, इन न्यूज, कागवाड

Tags: