Vijayapura

कोट्यवधी खर्च करूनही टॉर्चच्या प्रकाशात आपत्कालीन उपचार

Share

कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या सरकारी रुग्णालयात वीज पुरवठा खंडित होताच आपत्कालीन विभागात अंधार पसरला आणि डॉक्टरांना थेट मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात जखमींवर उपचार करावे लागले.

विजापूर जिल्ह्यातील देवरहिप्परगी येथील नूतन समुदाय आरोग्य केंद्रात हा संतापजनक प्रकार घडला. मंगळवारी रात्री इंडी रस्त्यावर बोलेरो, टमटम आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात सुमारे १० जण जखमी झाले असून ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तातडीने देवरहिप्परगी समुदाय आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात वीज नसल्याने आपत्कालीन विभाग अंधारात बुडाला होता.

पर्यायी व्यवस्था नसल्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मोबाईल टॉर्चच्या प्रकाशातच जखमींची तपासणी करून उपचार करावे लागले. रुग्णालयात जनरेटरची सोय आहे, मात्र त्यात डिझेल नसल्याने ते सुरू करता आले नाही. यामुळे संतप्त नातेवाईक आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची होऊन काही काळ गोंधळ उडाला.

सुमारे ८.३० कोटी रुपये खर्चून ३० खाटांचे हे सुसज्ज समुदाय आरोग्य केंद्र उभारण्यात आले असून पालकमंत्री डॉ. एम. बी. पाटील आणि आमदार राजुगौडा पाटील कुदरीसालवाडगी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण झाले होते. मात्र, ऐन आपत्कालीन स्थितीत विजेची साधी सोय नसल्याने रुग्णांची मोठी हेळसांड झाली. प्राथमिक उपचारांनंतर गंभीर जखमींना विजापूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

सरकारी रुग्णालयातील ही दुरवस्था थांबवून इनव्हर्टर, बॅकअप आणि जनरेटरसाठी आवश्यक इंधनाची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.

विजयकुमार सारवाड, इन न्यूज, विजापूर

Tags: