कोल्हापूरच्या अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये झालेल्या महत्त्वाच्या अवयवदानामुळे तीन जणांना नवीन जीवन मिळाले आहे.

ब्रेन-डेड झालेल्या एका तरुणाच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे यकृत आणि मूत्रपिंडांचे (किडनी) दान करण्यात आले असून, ग्रीन कॉरिडोरच्या साहाय्याने हे अवयव पुण्याला पाठवण्यात आले.

निपाणी येथे २७ सप्टेंबर रोजी झालेल्या रस्ते अपघातात निपाणी येथील ३४ वर्षीय तरुण निखिल नितीन बोंगाळे हे गंभीर जखमी झाले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना ब्रेन-डेड घोषित केले. या दुःखाच्या प्रसंगातही मृताच्या कुटुंबीयांनी अवयवदानासाठी पुढाकार घेतला, ज्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी त्यांना अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या पथकाने यशस्वीरीत्या अवयव संकलित केले. दान करण्यात आलेले यकृत आणि एक मूत्रपिंड पोलिस विभागाच्या सहकार्याने विशेष ‘ग्रीन कॉरिडोर’ तयार करून अत्यंत कमी वेळेत पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. तेथील दोन रुग्णांवर याचे यशस्वी रोपण करण्यात आले.
दुसरे मूत्रपिंड अॅस्टर आधार हॉस्पिटलमधीलच एका गरजू रुग्णावर उपचारासाठी वापरण्यात आले. यासोबतच नेत्रपटलाचे (कॉर्निया) जतन करण्यात आले असून, आगामी काळात नेत्ररोपणासाठी त्याचा वापर केला जाणार आहे. या कार्य कौतुकास्पद ठरले असून वैद्यकीय पथकाने यासाठी विशेष प्रयत्न केले.


Recent Comments