hubali

हुबळीत केएलईच्या नव्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे लोकार्पण

Share

हुबळी येथे उभारण्यात आलेल्या ‘केएलई मूरुसावरामाठ वैद्यकीय महाविद्यालय’ आणि १,२०० खाटांच्या अद्ययावत रुग्णालयाचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शुभेच्छा संदेशाद्वारे करण्यात आले.

अस्वास्थ्यामुळे अमित शाह प्रत्यक्ष येऊ न शकल्याने त्यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला. कार्यक्रमात केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांनी मूरुसावरा मठाने या प्रकल्पासाठी २३ एकर जागा दान दिल्याबद्दल आभार मानले. सुमारे ७०० कोटी रुपये खर्च करून हे रुग्णालय कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने सज्ज करण्यात आले असून बेळगावप्रमाणेच इथेही मोफत व दर्जेदार वैद्यकीय सेवा दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केएलई संस्थेच्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाची प्रशंसा केली.

या सोहळ्याला मूरुसावरा मठाचे श्री गुरुसिद्ध राजयोगेंद्र महास्वामीजी, खासदार जगदीश शेट्टर, बसवराज बोम्मई, आमदार महेश टेंगिणकाई, अरविंद बेल्लद, प्रसाद अब्बय्या, एम. आर. पाटील आणि संचालक अमित कोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: