बेळगाव येथील शहापूर भागात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोराला सामाजिक कार्यकर्त्यांच्या पथकाने तातडीने वाचवले. वेळेवर वैद्यकीय उपचार करून मोराला वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले.

शहापूर येथील केएलई आयुर्वेदिक रुग्णालयामागे जखमी मोरावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. ही माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, विकी मेहता, प्रथमेश साळोखे आणि धीर मेहता यांनी घटनास्थळी धाव घेत मोराची सुटका केली.

त्यानंतर कोल्हापूर वर्तुळाजवळील सोलमेट पेट क्लिनिकमध्ये मोरावर मोफत प्राथमिक उपचार करण्यात आले. उपचारांनंतर पुढील देखभाल व पुनर्वसनासाठी मोराला सुरक्षितपणे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले.
या घटनेमुळे शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव पुन्हा एकदा समोर आला आहे. नागरिक आणि वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी महानगरपालिकेने तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक रहिवासी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.


Recent Comments