Dharwad

धारवाडमध्ये कौटुंबिक वादातून तरुणावर हल्ला

Share

कौटुंबिक वादातून न्यायालयात उपस्थित राहून परतणाऱ्या तरुणावर सहा जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना धारवाडमध्ये घडली आहे.

धारवाडमधील मेहबूबनगर येथील रहिवासी शशिधर शिराळे हे कौटुंबिक वाद आणि घटस्फोटाच्या याचिकेसंदर्भात न्यायालयात हजर राहून परतत होते. त्यावेळी एसबीआय मुख्य शाखेजवळ सहा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर घातक शस्त्रांनी हल्ला केला. शशिधर यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

शशिधर आणि त्यांच्या पत्नीचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, नंतर कौटुंबिक मतभेदांमुळे पत्नीच्या नातेवाइकांनी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. शशिधर यांना घटस्फोट नको असल्याने यावरून पूर्वीही वाद झाले होते. यापूर्वीही दोन-तीन वेळा हल्ला झाल्याचा आरोप शशिधर यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

घटस्फोटासाठी दबाव आणण्याच्या उद्देशानेच पत्नीच्या नातेवाइकांनी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप शशिधर यांच्या कुटुंबाने केला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags: