खानापूर तालुक्यातील नंदगड, बीडी आणि आसपासच्या परिसरात ईद मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पार पडली. सण साधेपणाने आणि शांततेत साजरा करून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन नंदगडचे पोलीस निरीक्षक रविकुमार धर्मट्टी यांनी केले आहे.

नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बीडी, कक्केरी आणि गंदीगवाडसह विविध प्रमुख गावांमध्ये ईद मिलादच्या निमित्ताने खबरदारीचा उपाय म्हणून या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवताना पोलीस निरीक्षक रविकुमार धर्मट्टी यांनी, “समाजात सर्वांनी एकोप्याची भावना ठेवून सण साजरे करावेत. वाहतुकीला अडथळा न आणता शांततेत उत्सव साजरा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन केले.

कोणत्याही बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देत त्यांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले. यावेळी उपस्थित असलेल्या गावातील मुस्लीम बांधव आणि प्रमुखांनी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.


Recent Comments