आमदार राजू कागे यांच्या हस्ते कागवाड मतदारसंघातील श्री बसवेश्वर आणि ऐनापूर उपसा सिंचन योजनांचे विधिवत उद्घाटन झाले असून, कृष्णा नदीला पाणी आल्यानंतर या योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.


कागवाड मतदारसंघातील श्री बसवेश्वर आणि ऐनापूर उपसा सिंचन योजनांचे आमदार राजू कागे यांच्या हस्ते उद्घाटन झाले असून, यंदा कृष्णा नदीला महिनाभर उशिरा पाणी आल्यामुळे योजना सुरू होण्यास विलंब झाल्याने शेतकऱ्यांनी पाण्याचा संयमाने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. बसवेश्वर योजना पूर्ण करण्यासाठी आवश्यक ३०० कोटींच्या निधीबाबत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून याद्वारे ३० गावांना पाणी दिले जाईल, असे कागे यांनी सांगितले; तसेच बेळगाव जिल्हा मोठा असल्याने आगामी काळात लक्ष्मण सवदी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे, आपले प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्यातरी मंत्रिपद नको आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कार्यक्रमाला उपस्थित असलेले कवलुगुड्डा सिद्दाराम मठाचे अमरेश्वर महाराज यांनी आमदार राजू कागे यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत आगामी काळात ११ तलाव भरण्याच्या योजनेसाठीही त्यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सिंचन विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रवीण हुणसीकट्टी यांनी सांगितले की, या योजनांच्या माध्यमातून सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्राला पाण्याचा पुरवठा होणार असून शेतकऱ्यांनी काही अडचण असल्यास थेट विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
या प्रसंगी सिंचन विभागाचे अभियंता प्रशांत पोतदार, बसवराज गलगली, माजी जिल्हा परिषद सदस्य विनायक बागडी, चंद्रकांत इम्मडी, व्यवस्थापक के. नागेश यांच्यासह मंगसुळी, लोकूर, मदभावी, केंपवाड आदी गावांतील शेतकरी उपस्थित होते.
सुकुमार बन्नूरे, कागवाड.


Recent Comments