हुबळी-धारवाड महानगरपालिकेवर भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व राखले असून पक्षाच्या दुर्गम्मा बिजवाड यांची महापौरपदी, तर रत्नाबाई नाझरे यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. या विजयानंतर महापालिका आवारात भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जोरदार जल्लोष केला.


हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या सभागृहात आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक पार पडली. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या महापौरपदासाठी हुबळीतील प्रभाग क्रमांक ६९ च्या दुर्गम्मा बिजवाड तर सर्वसाधारण प्रवर्गातील उपमहापौरपदासाठी धारवाडच्या प्रभाग क्रमांक ९ च्या रत्नाबाई नाझरे या रिंगणात होत्या. काँग्रेसकडून महापौरपदासाठी कविता कब्बेर तर उपमहापौरपदासाठी दिलशाद बेगम नदाफ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत भाजप उमेदवारांना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, आमदार अरविंद बेल्लद, महेश टेंगिनकाई आणि अन्य लोकप्रतिनिधींचे पाठबळ लाभले, तर काँग्रेस उमेदवारांना आमदार प्रसाद अब्बय्या यांचे समर्थन होते.

एकूण ९२ सदस्य संख्या असलेल्या या महापालिकेत आज ८८ सदस्य उपस्थित होते, तर चार सदस्य गैरहजर राहिले. मतदानाअंती भाजपच्या दुर्गम्मा बिजवाड आणि रत्नाबाई नाझरे यांना प्रत्येकी ५० मते मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवारांना ३२ मतांवर समाधान मानावे लागले. बेळगाव विभागाच्या प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांनी भाजप उमेदवारांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली.
दुर्गम्मा बिजवाड यांनी यापूर्वी उपमहापौरपद भूषवले असून, एकाच टर्ममध्ये त्यांना आता महापौरपदाची संधी मिळाली आहे हे विशेष. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एस. एस. बिरादार आणि महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी उपस्थित होते.


Recent Comments