Belagavi

बेळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू देऊ नका

Share

बेळगाव जिल्ह्यात पावसाच्या तुटीमुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून राखीव निधीचा प्रभावी वापर करावा, तसेच गरज भासल्यास खाजगी कूपनलिका आणि टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते.पावसाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर, ज्या शाळांच्या खोल्या गळत आहेत किंवा दुरुस्तीची गरज आहे अशा ठिकाणी वर्ग भरवू नयेत, अशा सक्त सूचना मंत्री जारकीहोळी यांनी शिक्षण विभागाला दिल्या. जनावरांसाठी पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची कमतरता भासू नये म्हणून योग्य साठा करून ठेवावा. पावसामुळे मनुष्य किंवा वित्तहानी झाल्यास तात्काळ नुकसानभरपाई वितरित करावी. तसेच पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने पूर्वतयारी करावी आणि जनतेमध्ये जनजागृती निर्माण करावी. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात बियाणे आणि खतांचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

बैठकीत आमदार आसिफ सेठ यांनी शहरातील पाणी पुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला. शहरी भागात पाणी पुरवठा करणाऱ्या केंद्रांचा वीज पुरवठा खंडित करताना संबंधित अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देणे गरजेचे आहे. पाणी पुरवठा कंपनी आणि महानगरपालिकेने परस्परांमध्ये समन्वय ठेवून शहरात सुरळीत पाणी पुरवठा करावा, अशी सूचना त्यांनी केली.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जिल्ह्याविषयी माहिती देताना सांगितले की, बेळगाव जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील ३२ गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. सध्या १५ गावांमध्ये टँकर्सद्वारे तर २३ गावांमध्ये खाजगी कूपनलिकांद्वारे पाणी पुरवले जात आहे. महानगरपालिका क्षेत्राला हिडकल आणि राकसकोप जलाशयातून पाणी पुरवठा होतो. शहरात पाणी पुरवठ्यासाठी नियोजन केले असून गरज पडल्यास ३५ टँकर्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर्सवर देखरेख ठेवण्यासाठी जीपीएस यंत्रणा बसवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

या बैठकीला विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, पोलीस आयुक्त बोरसे गुलाबराव भूषण, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags: