बेळगावात झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. छत्रपती शिवाजी नगर भागातील गटारी तुंबल्याने निवासी भागात पाणी शिरले असून कॉलेज रोडवरील वनीता विद्यालय हायस्कूलच्या आवारात ड्रेनेजचे घाण पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली .


छत्रपती शिवाजी नगरमधील मोठ्या ध्वजस्तंभाजवळ प्लास्टिक आणि कचरा अडकल्याने मुख्य गटार पूर्णपणे तुंबले होते. यामुळे पाण्याचा निचरा न झाल्याने पंजी बाबा दर्गा परिसरातील सखल भागातील घरांमध्ये दूषित पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असून प्रशासन केवळ तात्पुरती मलमपट्टी करते, अशी तीव्र नाराजी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून रिक्षा व इतर वाहनांची कोंडी झाली आहे. या भागात योग्य रस्ते आणि सुरक्षित गटार व्यवस्था नसल्यामुळे अपघातांचा धोका वाढल्याची भीती स्थानिक चालकांनी व्यक्त केली आहे.

या समस्येची माहिती मिळताच आमदार आसिफ सेठ यांच्या वतीने युवा नेते अमान सेठ यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नागरिक गटारात प्लास्टिक आणि कचरा टाकत असल्यामुळेच हे ब्लॉक होत असून, नागरिकांनी कचरा न टाकता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अमान सेठ यांनी केले आहे.

दुसरीकडे, कॉलेज रोडवरील मुख्य ड्रेनेज ओव्हरफ्लो झाल्याने वनीता विद्यालय हायस्कूलमध्ये दूषित पाणी शिरले होते. ड्रेनेज लाईनमध्ये वर्षांपूर्वी बांधलेल्या उड्डाणपुलाचा पिलर आल्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याचे समोर आले असून, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी सक्शन मशीनद्वारे हे ब्लॉक हटवून पाण्याचा निचरा सुरळीत केला आहे.


Recent Comments