चिक्कोडी तालुक्यातील कब्बूर टोलनाक्याजवळ कारवरील नियंत्रण सुटून ती रस्त्या कडेला असलेल्या खोल दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात मलीकवाड गावातील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.


राजेंद्र शंकर पाटील (वय ५०) आणि शीला श्रीपती घाटे (वय ६५, दोन्ही रा. मलीकवाड) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण आपल्या कारने मलीकवाड येथून घटप्रभाच्या दिशेने प्रवास करत होते. कब्बूर टोलनाक्याजवळ कार आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्या कडेला असलेल्या खोल भागात उलटली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला असून दोघांना आपले प्राण गमवावे लागले.

या अपघातात कारमधील अन्य प्रवासी मोहन घाटे आणि प्रदीप घाटे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातढीने चिक्कोडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच चिक्कोडी पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली असून, याप्रकरणी चिक्कोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments