Kagawad

कागवाड तालुक्यात नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तक वाटपाला वेग

Share

राज्य शिक्षण विभागाने चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी नवीन पाठ्यपुस्तके तयार केली असून कागवाड तालुक्यात या पुस्तकांच्या वाटपाची प्रक्रिया गतिमान झाली आहे.

यंदा मूल्यशिक्षण, गणित आणि इंग्रजी विषयांच्या पुस्तकांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, दहावीच्या विद्यार्थ्यांना दैनंदिन नोंदींसाठी विशेष डायरी आणि मराठी-उर्दू माध्यमासाठी द्विभाषिक पुस्तके देण्यात आली आहेत. तालुक्यात एकूण १६५ शाळांमध्ये २१,५६३ विद्यार्थी (११,२१६ विद्यार्थी व १०,३४७ विद्यार्थिनी) शिकत असून, यामध्ये ५३६ मराठी आणि ४७१ उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

पुढील चार दिवसांत तालुक्यातील सर्व शाळांमध्ये पुस्तकांचे योग्य रीतीने वाटप पूर्ण होईल. तसेच पुस्तक वाहतुकीसाठी प्रति विद्यार्थी ४ रुपयांप्रमाणे येणारा खर्च मुख्यध्यापकांच्या खात्यावर जमा केला जाणार असल्याची माहिती शिक्षण संयोजक भरत बिलवडे यांनी दिली.

या वेळी शिक्षण संयोजक एस. आर. माळी, रमेश दुर्गाडे यांच्यासह मराठी व उर्दू शाळांचे शिक्षक उपस्थित होते. कागवाड तालुक्यात या सुलभ नियोजनामुळे शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात झाली आहे.

Tags: