प्रंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पट्टणकुडी येथील दाईंगडे मळा येथे उभारलेल्या ‘जी प्लस-२’ घरांचे वाटप केवळ गरजू आणि पात्र लाभार्थ्यांनाच करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी केली आहे.

निपाणी येथील सरकारी विश्रामगृहात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत चिंगळे यांनी या प्रक्रियेतील त्रुटींवर प्रकाश टाकला. यापूर्वीच्या सदोष यादीनुसार घरवाटपाचा प्रयत्न झाला होता, मात्र जनतेच्या हितासाठी तो रोखण्यात आला. सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नवीन प्रक्रिया सुरू असून, १०१२ लाभार्थ्यांची सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या प्रकरणाबाबत पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळेच प्रशासनाने पारदर्शक चौकशीचे आदेश दिले आहेत. आता घरांच्या वाटपात कोणताही घोटाळा होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी प्रत्येक प्रकरणाची कसून पाहणी करावी, असे आवाहन लक्ष्मण चिंगळे यांनी केले.
यावेळी केपीसीसी सदस्य राजेश कदम, नगर नियोजन समितीचे अध्यक्ष संयोजित पाटील, सुजय पाटील आणि चंद्रकांत जासूद यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments